breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनासारख्या महासंकटावर मात करून उद्योनगरीला पूर्वपदावर आणू – महापौर माई ढोरे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. इथला कष्टकरी कामगार हा या शहराचा पाठकणा आहे. लाॅकडाऊनमुळे शहरातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असला तरी लवकरच आपण कोरोनासारख्या महासंकटावर मात करून या औद्योगिक नगरीला पूर्वपदावर आणू, असा विश्‍वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त महापौर ढोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना महापौर ढोरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करुन त्या म्हणाल्या, इथल्या मातीमध्ये संतांची शिकवण रुजलेली आहे. या मातीने अनेक समाजसुधारकांना जन्मास घातले. पुरोगामी विचारांची दिशा याच मातीने देशाला आणि अवघ्या विश्वाला दिली. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले समर्पण देणाऱ्या प्रत्येकाच्या त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामगारांनी आणि कष्टक-यांनी या भूमीला आपल्या घामाने फुलवले. पिंपरी चिंचवड शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या उद्योगधंद्यांनी या नगरीला वैभवशाली बनवले. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची औद्योगिक पिंपरी चिंचवड नगरी घडली आहे. या शहराला स्मार्ट सिटी बनविणा-या या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांचे आभार महापौर ढोरे यांनी मानले.

कोरोनामुळे महापालिकेची सर्व यंत्रणा जोखीम पत्करुन कर्तव्य पार पाडत आहे. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार यांच्यासह पोलीस यंत्रणा देखील जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन महापौर ढोरे म्हणाल्या, बेघर, दिव्यांग, मजूर आदींसाठी महापालिकेने शहरातील विविध भागात स्वतंत्र निवाऱ्याची जेवणासह मोफत व्यवस्था केली आहे. शिवाय गरजूंना मोफत अन्न वाटप करण्यासाठी शहरातील अनेक संस्था आणि दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. महापालिका यात समन्वयाची भूमिका बजावत आहे. या माध्यमातून शहरात दररोज सरासरी ७५ हजार गरजू व्यक्तींना अन्न वाटप केले जात आहे असे महापौरांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान, सहभाग देत आहे. शासन आणि महापालिकेने कोरोना आजाराबाबत वेळोवेळी विविध सूचना आणि आदेश दिले आहेत. त्याचे पालन करत असल्याबद्दल महापौर ढोरे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरात रहावे, स्वत:ची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करुन महापौर ढोरे यांनी शहरवासियांना महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचा हिरक महोत्सव साजरा होत असताना आज सार्‍या जगावर कोवीड १९ अर्थात कोरोना साथीचे संकट ओढावले आहे. यातून आपण सर्वच जण लवकर बाहेर पडू असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button