breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत महापौरांच्या प्रभागासाठी पळवला 107 कोटींचा निधी

  • महापौरांनी अन्य नगरसेवकांच्या हातावर दिल्या ‘तुरी
  • भाजपचा आयुक्तांवर आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या प्रभाग क्रमांक 32 मधील रस्ते विकासकामांसाठी अन्य नगरसेवकांच्या प्रभागातील तब्बल 107 कोटी पळवण्यात आले आहेत. त्यामध्ये अन्य पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील प्रस्तावित व चालू विकास कामांचा करोडो रुपयांचा निधी महापौरांच्या प्रभागात वर्गीकरण केला आहे. त्यामुळे महापौरांकडून अन्य नगरसेवकांवर अन्याय झाला आहे. हा निधी पळवण्यासाठी भाऊंच्या नावाखाली दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक आरोप महापौरांवर केला जात आहे.

सांगवी प्रभाग क्रमांक 32 मधील नॅशनल स्कूल ते स्पायसर पुलपर्यंत व परिसरातील रस्ते विकासकामांसाठी 3 कोटी 16 लाख रुपयांची लेखाशिर्षावर सुधारित तरतूद केली आहे. वसंतदादा पुतळा परिसर ते माकन चौकापर्यंत व परिसरातील रस्ते अद्यावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 3 कोटी 1 लाखांची वाढीव तरतूद केली आहे. श्रीकष्ण मंदिर ते बॅंक ऑफ महाराष्ट्र ते सांगवी फाटा पर्यंत व परिसरातील रस्ते विकास करण्यासाठी 2 कोटी 91 लाखांची वाढीव तरतूद केली आहे. त्रिमूर्ती कॉर्नर ते रामकृष्ण मंगल कार्यालय पर्यंतचा रस्ता विकासित करण्यासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची वाढीव तरतूद केली आहे. नर्मदा गार्डन कॉर्नर ते माकन चौकपर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 1 कोटी 86 लाख रुपयांची वाढीव तरतूद केली आहे.

यासह अन्य विभागाच्या लेखाशिर्षावरील रक्कमेसह एकूण 12 कोटी 6 लाख 50 हजार एवढ्या रक्कमेचे वर्गीकरण केले आहे. तर, निगडी भक्ती-शक्ती येथील पुणे-मुंबई महामार्गावर काम सुरू असलेल्या उड्डाणपुलासाठीच्या स्थापत्य व विद्युत विषयक कामांसाठीची 94 कोटी 8 लाख एवढी रक्कम महापौरांच्या प्रभागात वर्गीकरण केली आहे. वर्गीकरणासह एकूण 107 कोटी 45 लाख एवढ्या वाढीव रक्कमेची तरतूद महापौरांनी आपल्या प्रभागातील विकास कामांना करून घेतली आहे. एवढी मोठी रक्कम एकट्या महापौरांच्या प्रभागात वर्ग करून सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने अन्य नगरसेवकांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. दुस-याच्या प्रभागातील विकासकामांची तरतूद पळविल्यामुळे त्याठिकाणची चालू विकासकामे रखडली जाणार आहे. परिणामी, त्याचा फटका तेथील नगरसेवकाला बसण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांवर भाऊंच्या नावाचा दबाव

कोविड 19 ची आपात्कालीन परिस्थिती असताना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्याही विकास कामांवर खर्च करण्यास राज्य सरकारने प्रतिबंध घातले आहेत. तसा आदेश राज्य शासनाने महापालिकेला पाठविला आहे. त्याला मुठमाती देऊन पालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिका-यांच्या ताटाखालचे मांजर झालेले अधिकारी वाट्टेल तसे काम करत आहेत. रस्ते विकासाच्या नावाखाली करोडो रुपयांची कामे मंजूर केली जात आहेत. लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर करून निधी पळवत आहेत. भाऊंच्या नावाखाली निधीची पळवापळवी सुरू असल्याची पालिका वर्तुळात चर्चा केली जात आहे. भाऊंचे नाव येताच संबंधित प्रभागाचा नगरसेवक सुध्दा त्याच्या प्रभागातील विकास कामांचा निधी पळवताना भीतीपोटी काही बोलत नसल्याचे वास्तव चित्र असल्याचे बोलले जात आहे.

व्यक्तीद्वेशापोटी सत्ताधा-यांचा आयुक्तांवर निशाना

भाजपने प्रभाग क्रमांक 25 ताथवडे येथील रस्ते कॉंक्रिटीकरणाला विरोध केला. त्याठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे अशी भूमिका भाजपच्या पदाधिका-यांची आहे. मात्र, शिवसेना नगरसेवक राहूल कलाटे यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे तक्रार केली. त्यावर राज्य सरकारने पालिकेला खुलासा मागितला. पालिकेने सरकारला रितसर माहिती कळविल्यानंतर ती चुकीची माहिती कळविल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी करत सुटले आहेत. तसे पत्र देखील महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. एकीकडे राहूल कलाटे यांच्या प्रभागातील विकास कामांना विरोध केला जात आहे. तर, दुसरीकडे महापौरांनी स्वतःच्या प्रभागात 107 कोटींचा निधी पळवला आहे, असा आरोप कलाटे यांनी केला आहे. एवढा निधी एकट्या महापौरांच्या प्रभागात कशासाठी वर्ग केला गेला ?. अन्य नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामे नाहीत का ?, 107 कोटींमधील थोडा-थोडा निधी अन्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करण्यासाठी देण्यात यावा, अशी मागणी राहूल कलाटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button