कोरोनाकाळात गृहपाठ तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नको
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/IMG-20200730-WA0012.jpg)
–विद्यार्थ्यांचा संपर्क वाढत असल्याने कोरोना संसर्ग होण्याचा धोका
–महापालिका शिक्षण प्रशासन अधिका-यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष
– शिवसेना पदाधिकारी संतोष सौंदणकर यांनी प्रशासनाला केल्या सूचना
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शहरात ‘कोविड १९’ विषाणुचे जीवघेणे संकट असताना पिंपरी-चिंचवडमधील काही प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ तपासण्याच्या नावाखाली शाळेत बोलावले जात आहे. सध्या कोरोनाव्हायरसचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने हवेतून हा विषाणू फैलत असल्याचे जाहीर झाले आहे. पालकही मुलांना शाळेत पाठवत असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र जमा होत आहेत. याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. जोपर्यंत राज्य शासनाचे तत्संबंधीत आदेश येत नाहीत. तोपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव शाळेत हजर राहण्याची सक्ती करू नये, अशी सूचना शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. वैद्यकीय विभागाकडून दैनंदीन बाधितांची जी आकडेवारी जाहीर केली जाते, ती अत्यंत भयावह आहे. दररोज १ हजारहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये तरुणांसह शालेय मुलांचा देखील समावेश आहे. अशी परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवडमधील काही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना गृहापाठ तपासण्यासाठी शाळेत हजर राहण्याची सक्ती केली जात आहे. मुळात राज्य सरकारने गृहपाठ तपासण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची नियमावली जाहीर केलेली नाही. राज्य सरकारने शहरी भागातील शाळांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्याचे आदेश दिले आहेत. शाळांकडून या नियमांचे पालन देखील केले जात आहे. मात्र, काही शाळा विद्यार्थ्यांना गृहपाठ तपासण्यासाठी शाळेत बोलावत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून मुलांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे. तरी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, हे सौंदणकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सध्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याचे राज्य सरकारचे आदेश नाहीत. त्यामुळे निर्जंतुकीकरणाची कोणतीही यंत्रणा शाळा व्यवस्थापनांनी आमलात आणलेली नाही. अशा वातावरणात पाल्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविणे अत्यंत चुकीचे आहे. काही पालक तर आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यास जात आहेत. मुळात विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे उमगत नाही. मुले एकत्र जमा होतात. एकमेकांच्या सपर्कात आल्यानंतर त्यांची सुरक्षितता राहत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग असल्यास त्याच्यापासून असंख्य विद्यार्थी बाधीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविणे म्हणजे त्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. तरी, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविता वैयक्तीक पातळीवर गृहपाठ तपासून घ्यावेत. ऑनलाईन अभ्यासक्रम पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन संतोष सौंदणकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील खासगी व मनपा शाळेच्या व्यवस्थापनाला शिक्षण प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी यासंबंधीत त्वरीत आदेश द्यावेत. एकही विद्यार्थी राज्य सरकारच्या आदेशाशिवाय शाळेत उपस्थित राहता कामा नये. यापुढे जर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला, तर याला शिक्षण प्रशासन अधिकारी म्हणून आपण जबाबदार असाल.
संतोष सौंदणकर – शिवसेना शहर संघटक, चिंचवड विधानसभा