कोयना आणि प्रगती एक्स्प्रेस १० दिवसांसाठी रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/1564200802.jpg)
पुणे महाईन्यूज
मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस पुढील १० दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडून या गाड्या धावणाऱ्या मार्गावर म्हणजे मंकी हिल ते कर्जत दरम्यान तांत्रिक तसेच देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या कोयना, प्रगती एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रामधील काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे तसेच रुळावरील खडी वाहून गेल्यामुळे रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. भर पावसात रेल्वे दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र काही महत्वाची कामं अद्यापही शिल्लक आहेत. ही दुरुस्तीचे कामं पुढच्या १० दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक १० दिवस बंद राहणार आहे.
दरम्यान, मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस पुण्यातून सुटणार आहे. प्रगती आणि कोयना एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तर मुंबईतून धावणाऱ्या हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई -पंढरपूर पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी ५ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे. हुबळी- मुंबई, हैद्राबाद एक्स्प्रेस, विशाखापट्टनम एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस या गाड्या मुंबईला न येता त्या पुण्यापर्यंतच धावणार आहेत.