केंद्र व राज्य सरकारने दुधाला 20 रुपये अनुदान द्यावे, संभाजी ब्रिगेडची मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतक-यांना आर्थिक दृष्ट्य सक्षम करण्यासाठी सरकारने दुधाला प्रति लिटर 20 रुपये अनुदान दुध संघाला न देता शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
काळे यांनी मोदींना यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कृषी व्यवस्थेचा कणा असणारा दुध उत्पादन करणारा शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणांचा बळी ठरत आहे. कृषी प्रधान देशात जर दुधापेक्षा पाणीच महाग असेल, तर हे कृषी प्रधान देशाचे दुर्दैवच आहे. २१ ऑगस्ट रोजी गाईच्या एक लिटर दुधाला १९ रुपये भाव मिळाला. २३ सप्टेंबर 2020 रोजी पुरोहित स्वीट होम थेरगाव येथे एक लिटर पाण्याची बाटली २० रुपयाला मिळाली.
महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुध उत्पादन करण्यासाठी गायी म्हशी मोठ्या प्रमाणावर पाळतात. शेतकऱ्याला एक लिटर दुधासाठी २५ रुपये खर्च येतो. जर्शी गाईला लागणारे पशुखाद्य, औषध, यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दुधापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक आहे.
महाराष्ट्रात जो GST जमा होतो. त्यामधील अर्धा वाटा केंद्र सरकारला व अर्धा वाटा राज्य सरकारला मिळतो. दुध विक्रीतून जे शेतकऱ्यांना नुकसान होते. त्याच्या भरपाईपोटी दुध उत्पादकांना प्रतिलिटर २० रुपये अनुदान देण्यात यावे. त्यातील १० रुपये केंद्र सरकारने तसेच १० रुपये राज्य सरकारने द्यावेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतक-यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी दुध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती लिटर २० रुपयांचे अनुदान दुध संघाला न देता दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी काळे यांनी निवनेदनाद्वारे केली आहे.