कार्तिकी वारी सोहळा; राज्य सरकारकडे भूमिका मांडणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/0alndi_333.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिनानिमित्त डिसेंबर महिन्यात होणा-या कार्तिकी वारी सोहळा आणि मंदिर उघडणे याबाबत देवस्थानबरोबर झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारकडे प्रशासनाकडून भूमिका मांडली जाईल, असे आश्वासन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दिले आहे.
आज पिंपरी-चिंचवड पोलिस अतिरीक्त आयुक्त रामनाथ पोकळे आणि देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त अॅड विकास ढगे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर, विवेक लावंड यांची महत्वपूर्ण बैठक झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने शासनाने आषाढी वारीप्रमाणे निर्णय घेण्यास अधिक वेळ न घेता लवकरात लवकर परवानगी द्यावी. म्हणजे राज्यभरातून येणा-या दिंड्यासोबत समन्वय राखणे सोयीस्कर होईल, अशी मागणी आळंदी देवस्थानच्या वतीने पोलिस प्रशासनाच्या आज झालेल्या पिंपरी पोलिस आयुक्तालयातील बैठकीत सांगण्यात आले.
अवघ्या महिन्याभरावर कार्तिकी वारी येवून ठेपल्याने शासनाची मंदिराबाबत आणि वारीतील लोकांच्या संख्येबाबत काय भुमिका आहे, याची प्रतिक्षा राज्यभरातील वारक-यांना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाल बंद असलेली मंदिर उघडावीत यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहे.
यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा पार पडणार याकडे वारकरी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी सांगितले, ”संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणारी कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर), कार्तीकी वद्य एकादशी (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी ( १३ डिसेंबर) ला आहे. पोलिस आणि देवस्थान सकारात्मक चर्चा झाली. देवस्थानने मांडलेल्या मुद्द्यांबाबत सरकार दरबारी कळवले जातील अशी ग्वाही पोलिसांकडून मिळाली.