कामावरून कमी केल्याने कंत्राटी कामगारांचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ प्रभागातील कंत्राटी सफाई कामगारांना मागणी करूनही कामावर न घेतल्यामुळे नगरसेविका कमल घोलप यांनी मोरे वस्ती येथील कचरा रॅम्पच्या समोर कामगारांसह आज कामबंद आंदोलन केले. तरीही, प्रशासन वटनीवर येण्याच्या हालचाली दिसत नसल्यामुळे कामगारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोरच ठिय्या मांडला. नवीन कचरा निविदा प्रक्रियेतील अटी शर्तींनुसार कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने नवीन निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यातील अटी शर्तीनुसार काही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काही कंत्राटी कामगरांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांना तशा पूर्वसूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, नगरसेविका कमल घोलप यांनी कचरा वेचक-वाहक-सफाईगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्यामुळे त्यांना कामावर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने त्यांच्या मागणीचा विचार न केल्यामुळे घोलप यांनी आज फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील चिखलीचा कचरा रॅम्प बंद करून कामगारांसह आंदोलन केले.
या कामगारांनी दुपारी पिंपरी महापालिकेच्या समोर ठिय्या मांडला होता. आरोग्य विभागातील अधिका-यांनी त्यांची भेट घेऊन अटी शर्तींची माहिती सांगितली. त्यानुसार या कामागारांना पुन्हा कामावर घेता येणार नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल 40 कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे.