कामगार दिनीच, मेट्रो प्रकल्पाच्या कंत्राटी कामगारांचे उपोषण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/metro_2017071333.jpg)
- पाच महिन्यापासून पगार, पीएफ, ईएसआय मिळेना
- महामेट्रोच्या नऊ स्टेशनचे काम ठप्प
पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वारगेट ते पिंपरी या मार्गावर महामेट्रो प्रकल्पांचे काम सुरु आहे. पिंपरी ते रेंजहिल्स यादरम्यान होणा-या मेट्रो स्टेशनचे काम मे.एचसीसी अल्फा इन्फ्रा प्राजेक्ट प्रा. लि. कंपनीला दिले आहे. त्या कंपनीच्या कामगाराचे मागील पाच महिन्याचा पगार होत नसल्याने उपासमार होत आहे. तसेच एक वर्षाचा कामगारांचा पीएफ, ईएसआय देखील भरलेला नाही. त्यामुळे आम्हा कामगारांचा पगार मिळावा, या मागणीसाठी वल्लभनगर येथील कार्यालयासमोर उद्या (बुधवार) सुमारे शंभरहून अधिक कामगार उपोषणाला बसणार आहे.
पिंपरी ते रेंजहिल्स येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. हे काम महामेट्रोने मे.एचसीसी-अल्फा इन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. ही कंपनीला दिलेले आहे. या कंपनीकडून विविध विभागात शंभराहून अधिक कामगार काम करत आहेत. या कामगारांचे डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत ५ महिन्यांचा पगार झालेला नाही. या कामगारांचे मासिक पगार थकीत असून त्यातील काही कामगारांना एक महिन्याचा पगार दिला आहे. तर काही कामगारांना दोन महिन्याचा पगार देऊन सक्तीने राजीनामे लिहून घेतले आहेत.
उर्वरित कामगारांना राजीनामा न देल्यास सक्तीने कामावरुन काढणार, अशा धमक्या देत आहे. दोन महिन्याचा पगार घेऊन राजीनामा दिल्यास उर्वरित दोन महिन्याचा पगार मिळण्याची कामगारांना शाश्वती नाही. त्यामुळे कामगारांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. कंपनीने बळजबरीने या सर्व कामगारांना निलंबित केले आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात या कंपनीचे कामगार प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, अरुण गायकवाड, अलिम तांबोळी, मोहन गायकवाड, आनंद कुमार, विनोद बिसेन हे सर्व कामगार वल्लभनगर एस टी स्टॅण्ड शेजारी मे.एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनी कार्यलयासमोर बुधवार दि. १ मे २०१९ सकाळी १० वाजल्यापासून अमर उपोषण सुरु करीत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र दिनीच महामेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनीकडील कामगारांना पगार न मिळाल्याने उपोषण करावे लागत आहे. त्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचे दिसत आहे.