करोना लसीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘टास्क फोर्स’ स्थापन
![The city of Pune will complete two vaccinations in a month ', the mayor assured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-vaccine.jpg)
अतिरिक्त आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन, पुर्वनियोजनासाठी उद्या होणार बैठक
पिंपरी |महाईन्यूज|
जनतेला करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने टास्क फोर्सची (Task Force For Corona Vaccination) स्थापना केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन झाली असून उद्या (शुक्रवारी) लसीकरण पुर्वनियोजन बैठक घेण्यात येणार आहे.
करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रणाली काय असावी, लसीकरण कशा पद्धतीने करावं, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उपलब्ध करणे, लसीकरणाच्या अनुषगाने साहित्य, उपकरणे उपलब्ध करणे, पहिल्या टप्प्यात लस कोणाला द्यायची हे ठरविणे, यासह लसीकरणासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.
शहरात काही लोक मास्क लावताना हलगर्जीपणा करत आहेत. मास्क सोबत असतो पण लोक तो लावत नाहीत. काही लोक मास्क तोंडाखाली लावतात, पोलीस दिसले की मास्क लावतात आणि नंतर काढून टाकतात. लोकांनी जर मास्कचा वापर केला नाही तर करोनाची संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
तसेच कोविडमधून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या देखील आढळत आहेत. आरटीपीसीआर चाचण्या अधिक वाढविणे, तसेच संसर्गग्रस्त व्यक्तीचे जास्तीतजास्त संपर्क शोधण्यास सांगण्यात आले आहे. करोना परिस्थिती लक्षात घेऊन दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे आवश्यक आहे. परंतू, नागरिकांकडून हलगर्जीपणा वाढत चालला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा रुग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे.