कंपनी मालकाची कामगारांकडून पाच लाखांची फसवणूक
![Two sisters arrested for spying for Pakistan in Madhya Pradesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/fraud-online_2017071396.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – कंपनीत काम करणा-या दोन कामगारांनी मालकाचा विश्वास संपादन करून मालकाच्या बँक खात्यातील पाच लाख रुपये अन्य बँक खात्यात ट्रान्सफर करून फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोनजणांना ताब्यात घेतले. हा प्रकार सोमवारी (दि. 24) उघडकीस आला आहे.
प्रविण विष्णुदास राठी (वय 31, फ्लॅट नं. 1, वेदगौरव अपार्टमेंट, शिवणे) आणि नवनीत कृष्णकुमार मेहता (वय 27, रा. मु. पो. नागदा, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) या दोघांना अटक झाली आहे. याप्रकरणी अजिज अर्जुन कदम (वय 36, रा. फ्लॅट नं. 201, चंद्ररंग शिल्प, अनंतनगर, शहिद भगतसिंग चौक, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण हा अजिज कदम यांच्या बालेवाडीतील कन्सिस्टी सिस्टम प्रा. लि. कंपनीत कामगार होता. नवनीत हा त्याचा मेव्हना असून त्या दोघांनी संगणमत करून मालकाचा विश्वास संपादन केला. दोघांनी मालकाच्या बँक खात्यातील 5 लाख 9 हजार 764 रुपये अन्य बँक खात्यात वर्ग केले आहेत. यात कंपनी मालक अजिज कदम यांची फसवणूक झाली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.