एनआरसी विरोधात पिंपरीत एल्गार; 17 जानेवारीला निषेध सभेचे आयोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/13-2.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात निषेध महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान बचाव समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने याचे आयोजन केले आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला दिल्ली येथील जेएनयुचा माजी विद्यार्थी उमर खालिद संबोधित करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मानव कांबळे म्हणाले की, या समितीमध्ये शहरातील 30 विविध संघटनांचा समावेश आहे. सभेवेळी सुमारे 25 हजार नागरिक एकत्र येतील असा अंदाज आहे. आणखी काही प्रमुख वक्ते बोलावण्यात येणार आहेत. त्या बाबत नंतर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या बरोबरच राज्य सरकारला पाठपुरावा करून एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा रद्द करावा अशी मागणी करणार आहे. इतर राज्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. महाराष्ट्र राज्याने देखील या कायद्याला हद्दपार करणे गरजेचे आहे.
केंद्र सरकार आधारकार्डला नागरिकत्त्व सिद्ध करण्यासाठीचा पुरावा मानायला तयार नसल्याचे सांगत आहे. इतर कागदपत्रे सांगू असे सांगत आहेत. ही कागदपत्रे जमवाजमव करताना नागरिकांचे हाल होणार आहे. आदिवासी, एससी व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे. त्यामुळे या कायद्याला हद्दपार करण्यासाठी ही निषेध सभा घेण्यात येणार आहे. या सभेला शहरातील सर्व पुरोगामी संघटना, पक्ष व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही या वेळी आयोजकांनी केले.