एक मार्चपासून पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे
![From March 1, you will have to pay for parking in Pimpri-Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/road-smart-parking-.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी- चिंचवड शहरात वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर यासाठी झोननिहाय सशुल्क पार्किंग धोरणाची अंमलबजावणी एक मार्चपासून केली जाणार आहे. त्यातून शहरातील वाहतूकीला शिस्त लागणार आहे.
पिंपरी- चिंचवड औद्योगिक नगरीची लोकसंख्या सुमारे २१ लाख असून वाहनसंख्या १६.५ लाख आहे. नागरिक विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनाने ये – जा करत असतात. हे करताना पार्किंग योग्य ठिकाणी करणे हा दिवसेंदिवस एक जटील प्रश्न बनला आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी वाहनतळ धोरण तयार केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड, दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळुरु, नागपूर या शहराच्या पार्किंग धोरणांचा अभ्यास करण्यात आला. २२ जून २०१८ रोजी महापालिका सभेची या धोरणास मान्यताही मिळाली. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सध्यस्थितीत शहरात गेल्या २० वर्षात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांचे प्रमाणही वाढते आहे. सन २००१ मध्ये १ लाख ६४ हजार असणाºया दुचाकी आता ११ लाख ६९ हजारावर गेल्या आहेत. चार चाकी वाहनांची संख्या २००१ मध्ये २० हजार होती. ती आता अडीच लाखांवर पोहोचली आहे. २००१ मध्ये शहरात दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारची २ लाख १० हजार वाहने होती. हा आकडा २०१७ मध्ये १५ लाख ६८ हजारावर गेला आहे. तसेच पार्कींगचे दर ठरविताना इक्वीव्हॅलेंट कार स्पेस (समतुल्य कार अवकाश तक्ता) हा मुख्य तांत्रिक मुद्दा विचारात घेतला आहे. रस्त्यावरील पार्कींगसाठी झोन तयार केले आहेत. एका तासासाठी दुचाकी आणि रिक्षांसाठी पाच रूपये, मोटारी आणि टेम्पोसाठी दहा रुपये आणि खासगी ट्रक आणि बससाठी शंभर रुपये प्रति तास आकारण्यात येणार आहे.
असे आहेत झोन…
पॉलीसीच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पार्कींग अॅप तयार करून पार्कींगचे नियंत्रण करणार आहे. पार्कींग पॉलीसी ठरविताना पार्कींग मागणीनुसार पार्कींग शुल्क आकारण्याचे निश्चित केले. त्यानुसार, शहर तीन झोनमध्ये विभागण्यात आले. शहरात ज्या ठिकाणी दिवसभर ८० ते १०० टक्के पार्कीगची आवश्यकता आहे, असे ठिकाण झोन अ (उच्च), ज्या ठिकाणी वाहन उभी करण्याचे प्रमाण ६० ते ८० टक्के आहे, असे ठिकाण झोन ब (मध्यम), ज्या ठिकाणी ४० ते ६० टक्के पार्कींगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन क (कमी) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्वष्ठ करण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ड (कमीत कमी) म्हणून घोषीत केले.
…………..
पहिला भाग- निगडी वाल्हेकरवाडी स्पाईन रस्ता, टिळक चौक, आकुर्डी, पिंपरी, कासारवाडी, दापोडी रेल्वे स्थानक परिसर.
दुसरा भाग- वाल्हेकरवाडी रस्ता, हिंजवडी ते चिंचवड स्टेशन रस्ता, काळेवाडी फाटा ते एम्पायर रस्ता.
तिसरा भाग- केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट ते देहूआळंदी रस्ता, स्पाईन रस्ता.
भाग चार- टेल्का रस्ता.
भाग पाच- टेल्को रस्ता नाशिक फाटा -मोशी रोड