उपमहापौरांना मुक्ताफळांचा हिशोब द्यावा लागणार, राष्ट्रवादीने खुर्चीला घातला शेतीफळांचा हार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201209-WA0011.jpg)
- शेतकरी विरोधी विधान उपमहापौरांच्या आले अंगलट
- माफी मागावी, अन्यथा पालिकेत पाय ठेवता येणार नाही
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत उपमहापौर केशव घोळवे यांनी देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले. शेतक-यांच्या आंदोलनासाठी पाकिस्तान आणि चिनच्या पाठबळावर प्रतिव्यक्ती 300 रुपये देऊन मानसे आणल्याची मुक्ताफळे उपमहापौर घोळवे यांनी काल पार पडलेल्या भर सभेत उधळली.
उपमहापौरांनी देशभरातील तमाम शेतक-यांचा अवमान केला आहे, त्यांनी शेतक-यांची त्वरीत माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने उपमहापौरांच्या केबिनमध्ये जाऊन केली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याचे समजताच घोळवे यांनी त्वरीत अॅण्टी चेंबरचा आसरा घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी घोळवे यांनी बाहेर येऊन कालच्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर घोळवे यांनी बाहेर येण्यास नकार दिला. त्यानंतर मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोळवे यांच्या खुर्चीला शेतीफळांचा हार घालून जाहीर निषेध केला. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत घोळवे यांना महापालिकेत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मिसाळ यांनी दिला.
दरम्यान, जय जवान… जय किसान…, किसान एकता जिंदाबाद.. अशा घोषणा देण्यात आल्या. शेतक-यांचा अवमान केल्याप्रकरणी उपमहापौर घोळवे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर आदी यावेळी उपस्थित होते.