उद्या ठरणार राष्ट्रवादीचा उमेदवार?, भोसरीत शरद पवार यांची गोपनीय बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190605-WA0017.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदार संघातील राष्ट्रवादीचा उमेदवार साहेबांनी जाहीर करावा अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. उमेदवाराच्या नावाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी माजी आमदार विलास लांडे शिष्ठमंडळासह साहेबांच्या भेटीला गोविंद बागेत गेले होते. मात्र, शरद पवार यांच्या वेळेअभावी शिष्टमंडळाला परतावे लागले. यावर सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांना स्फुर्ती देण्यासाठी पवार साहेब उद्या भोसरीत दोन तास वेळ देणार आहेत. भोसरी मतदार संघाचा उमेदवार कोण असणार, हे उद्या जवळपास निश्चित होणार आहे.
- शिरूर लोकसभा मतदार संघातून डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर भोसरीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. विधानसभा निवडणुकीत देखील भोसरीत राष्ट्रवादीचा आमदार होणार याची त्यांना खात्री वाटू लागली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार हे एकदाचे निश्चित झाल्यानंतर कामाला लागण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. त्यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी गोविंद बागेत जाण्याचे नियोजन होते. परंतु, दत्ता काका यांचे चुलते निधन पावल्यामुळे त्यांना जाणे शक्य झाले नाही. तरी, माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली भोसरीतील शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 4) बारामती येथे पवार यांची भेट घेतली. परंतु, त्यांनी वेळेअभावी बैठक आटोपती घेतली.
उद्या गुरूवारी (दि. 6) भोसरी एमआयडीसी भागातील एका खासगी हॉटेलमध्ये पवार यांनी दोन तासाचा वेळ खास भोसरीतील पदाधिका-यांसाठी दिला आहे. दरम्यान, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. त्यानंतर पवार हे भोसरी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत भोसरी मतदार संघाचा उमेदवार कोण असणार याचे संकेत मिळू शकतात. स्पष्टपणे उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता कमी वाटत असली तरी किमान उमेदवार कोण असणार याचे संकेत मिळू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.