उत्सवात दारु प्याल तर तुरुंगात जाल – पालकमंत्री गिरीश बापट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Girish-Bapat.jpg)
पिंपरी – यंदा गणेशोत्सव दणक्यात करा, पण डीजे, डॉल्बी आणि दारुमुक्तही हवा. उत्सवकाळात दारू प्याल, तर तुरुंगात जाल,” असा इशारा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात गिरीश बापट हे बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेविका शारदा सोनवणे, भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले,”गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या वेळी काही उत्साही कार्यकर्त्यांचा मद्यपान करून धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांना हवे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. पण या उत्सवाचा खरा हेतू साध्य होताना आज दिसत नाही.”
“धार्मिक सण साजरे करताना प्रत्येकाने अन्य धर्माचा अनादर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या उत्सवांमध्ये सुरक्षितताही महत्त्वाची आहे. कारण समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करून जाती-धर्मामध्ये विष पेरण्यासाठी टपलेलेच आहेत. त्यामुळे सामाजिक सलोखा व जातीय सलोखा ठेवून येथील शांतता कायम ठेवून गणेशोत्सव साजरा करा” असेही त्यांनी सांगितले.