इच्छुकांच्या समर्थकांचा सभेत व्यत्यय, आता गप्प बसा… नाही तर तिकीटच देणार नाही, अजितदादा संतापले (video)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/Ajit-Pawar-Jat.jpg)
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा, इच्छुक कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात जोरदार घोषणा देवून सतत वक्त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्या समर्थकांना घोषणा थांबवण्याची विनंती करुनही ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या अजित पवारांनी स्वतः उठून त्या समर्थकांना उद्देशून म्हणाले की, आता जर कोणी घोषणा दिली, तर त्याला तिकीटच देणार नाही, असं ठणकावून सांगितले. त्यानंतरही समर्थकांच्या घोषणा सुरुच होत्या.
काळेवाडी येथील एका कार्यालयात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा आज (रविवारी) आयोजित केला होता. यावेळी अजित पवार, अमोल मिटकरी, संजोग वाघेरे, आण्णा बनसोडे, भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, नाना काटे आदी उपस्थित होते. पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्या मतदारसंघातून माजी आमदार आण्णा बनसोडे, सुलक्षणा शिलवंत – धर, शेखर ओव्हाळ हे इच्छुक आहेत. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणा बाजी केली. त्या घोषणामुळे वक्त्यांच्या भाषणात सतत व्यत्यय येत होता. त्यावर अजित पवार काहीच बोलले नाहीत.
सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठाशेजारी गर्दी केली. अखेर कार्यकर्त्यांना बाजूला थांबा अस माईक मध्ये सांगावं लागलं. तेवढ्यात, पुन्हा आणखी एक इच्छुक उमेदवार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांसह व्यासपीठाच्या दिशेने येत होता. सोबत अनेक कार्यकर्ते होते. तेव्हा, अजित पवार यांनी उठून माईकजवळ आले. “आता जर घोषणा दिली तर तिकीटच देणार नाही,” असा दम इच्छुक उमेदवारांना दिला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.