इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी युवकचे उद्या पिंपरीत आंदोलन
![Nationalist youth's agitation in Pimpri tomorrow against fuel price hike](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/VISHAL-WAKADKAR-1.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने उद्या पिंपरीत आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे सोमवारी (दि. ११) दुपारी 2 वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र, भाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना ‘अच्छे दिन’ पहावयास मिळाले नाहीत. वाढत्या इंधन दरांमुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे. तसेच महागाईसुद्धा वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर सगळ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. एक जागरूक नागरिक आणि युवक संघटन या नात्याने इंधन दरवाढी विरुद्ध अहिंसक पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वाकडकर यांनी दिली.
युवकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण, राष्ट्रवादी कॉग्रस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, पुणे शहर युवक अध्यक्ष महेश हांडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विशाल शंकर वाकडकर तसेच सर्व प्रदेश कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोना साथीचे भान ठेऊन सर्वांनी मास्क वापरावा आणि सामाजिक अंतर ठेऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वाकडकर यांनी केले.