‘इंद्रायणी थडी’त होणार रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Mahes-14414.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी ।
- प्रवेशद्वारासमोर साकारतेय पुण्यातील पुतळ्याची प्रतिकृती
- आमदार महेश लांडगे यांच्याकडून जत्रेत प्रबोधनावर भर
महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ भोसरीमध्ये भरवली जात आहे. या जत्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याला ‘सलाम’ केला आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील रमाबाई यांच्या पुतळ्याची प्रतिकृती जत्रेच्या प्रवेशद्वारासमोरच उभारली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डॉ. आंबेडकर आणि रमाबाईंच्या कार्याचे स्मरण होईल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
भोसरी येथील गावजत्रा मैदानावर भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरवली जात आहे. दि.३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० असे चार दिवस सकाळी १० ते रात्री १० ही जत्रा सुरू राहील. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी थीम घेवून भरविण्यात आलेल्या जत्रेत सर्वांना निशुल्क प्रवेश मिळणार आहे.
अयोध्योतील राम मंदिराची प्रतिकृती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, ‘रामायण’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो, ऐतिहासिक फुलेवाडा प्रतिकृती, ग्राम संस्कृती, बाल जत्रा यासह शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन आदी विविध बाबींमुळे जत्रा ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरणार आहे. त्यातच आता शिल्पकार महेंद्र थोपटे आणि योगेश कुंभार यांनी पुण्यातील रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती साकारली आहे. त्याचे अनावरण आमदार लांडगे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे श्री. इनामदार उपस्थित होते. इंद्रायणी थडीच्या प्रवेशद्वारासमोर सामाजिक बंधुभावाची शिकवण देणाऱ्या रमाबाईंच्या कार्याचे स्मरण जत्रेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
संविधान भवनातील पुस्तकांचे प्रदर्शन…
पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन साकारले जात आहे. भारतीय संविधानसह जगभारतील विविध राज्यघटनांचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने हा आदर्शवत प्रकल्प उभारला जात आहे. या संविधान भवनमधील विविध पुस्तांचे प्रदर्शन इंद्रायणी थडीमध्ये भरवण्यात येईल. त्याद्वारे भारतीय संविधान आणि नागरिकांचे अधिकार व कर्तव्य याबाबत जनजागृती करण्याची भूमिका जत्रेच्या संयोजकांनी ठेवली आहे.