breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी भोसरीकरांचे “रिवर सायक्लोथॉन” अभियान

  • अभियानात नागरीकांचा सहभाग महत्वाचा
  • आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – स्वच्छ भारत अभियान आणि नमामि गंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रायणी मातेचे पावित्र्य जपण्यासाठी ‘रिवर सायक्लोथॉन 2018’ हे अभियान राबविण्यात येत आहे. भोसरी परिसरात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणारी अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे, महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 2 डिसेंबर) रिवर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरी व ग्रामिण भागातील नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

पिंपरी येथे मंगळवारी ‘अविरत श्रमदान’ संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार लांडगे यांनी ही माहिती दिली. यावेळी महापौर राहुल जाधव, सायकल मित्र पुणे संस्थेचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, रिवर सायक्लोथॉनचे निमंत्रक पै. सचिन किसनराव लांडगे, पिंपरी चिंचवड मनपा इंजिनिअर असोशिएशन जयकुमार गुजर, सुनिल बेळगावकर, श्रीनिवास दांगट, पिंपरी चिंचवड बार असोशिएशनचे ॲड. सुनिल कडूसकर, सोमनाथ मसगुडे, ॲड. आतिष लांडगे आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, देशभरातील प्रमुख नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ‘नमामि गंगा अभियान’ राबविले जात आहे. तशाच पध्दतीने राज्यातील प्रमुख सर्व नद्या प्रदूषण मुक्त करण्याचे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. नदी प्रदूषण रोखण्याच्या या अभियानामध्ये प्रशासनाबरोबरच समाजातील सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक, गृहिणी, कामगार, उद्योजक आदींसह सर्व नागरीकांनी सहभाग असावा. या उद्देशाने रिवर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सायकल रॅली, मानवी साखळी, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच प्रत्यक्ष श्रमदान, देहू ते आळंदी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. रविवार दि. 2 डिसेंबर रोजी शहरातील सायकल प्रेमींसाठी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहापासून सकाळी 6.30 वाजल्यापासून दहा कि.मी., पंधरा कि.मी. आणि पंचवीस कि.मी.च्या सायकल रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 3 डिसेंबर रोजी आळंदीमध्ये कार्तिक एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखों भाविक भक्त आळंदीत उपस्थित राहतील. रिवर सायक्लोथॉनच्या माध्यमातून देण्यात आलेला नदी स्वच्छता अभियानाचा संदेश वारक-यांच्या माध्यमातून राज्यभर पोहचेल. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकल प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी शालेय विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवकांची मानवी साखळी साकारण्यात येणार आहे. या साखळीत सर्व नागरीकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लांडगे यांनी केले आहे.

डॉ. निलेश लोंढे म्हणाले की, या उपक्रमात शहरातील सर्व माध्यमातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्या-या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य विनामुल्य आयोजकांकडून देण्यात येईल.

दिगंबर जोशी म्हणाले की, इंद्रायणी स्वच्छता अभियान रिवर सायक्लोथॉन पुरतेच मर्यादित न राहता ‘एक पाऊल भावी पिढीसाठी – इंद्रायणीच्या रक्षणासाठी’ पुढे कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचे नियोजन आहे. यामध्ये विविध, संस्था, संघटनांना सहभागी करुन घेण्यात येईल. या अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन करणे, पाणी आडवा – पाणी जिरवा, पशू, पक्षी यांचे संवर्धन करणे, पक्षालय सुरु करणे, उत्सव काळात निर्माल्य व मुर्ती नदीत टाकू नये यासाठी समाज प्रबोधन करणे, आठवड्यातून एक दिवस कोणतेही वाहन न वापरता फक्त सायकलने प्रवास करणे, आठवड्यातून एक दिवस इंद्रायणी नदी परिसरात श्रमदान करणे असे विविध पर्यावरण पुरक उपक्रम अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे, महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने राबविण्यात येणार आहेत. यामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button