इंग्रजी शाळांवर आर्थिक संकट, संस्थाचालकांनी पुकारला तीन दिवसीय बंद
![Annoying! Thirteen students were expelled from school for non-payment of fees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/fees-to-schools.png)
- पन्नास टक्क्यांहून अधिक पालकांकडे शुल्क भरणा बाकी
- प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी 15 ते 17 शाळा बंद आंदोलन
पिंपरी / महाईन्यूज
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शहरातील शैक्षणिक संस्था आर्थिक संकटात आल्या आहेत. पन्नास टक्क्यांहून अधिक पालकांनी शुल्क न भरल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत यापुढे शिक्षण सुरू ठेवणे संस्थांना शक्य नाही. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ स्कूल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेने 15 ते 17 डिसेंबर या तीन दिवसांत शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
सलग तीन दिवस पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश खासगी शाळेतील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी सोमवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत दिली. शाळांमार्फत मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी कामकाज सुरू आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शाळांची स्थिती लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोलन पुकारण्याची वेळ आली आहे. आम्ही पालकांना शुल्क भरण्यासाठी मुदतही दिली आहे. काही पालकांनी शुल्क भरले आहे. पण काहीजण आता आम्ही फोन करूनही तो घेत नाहीत. असे असेल तर शाळा कशा चालवणार ? म्हणूनच आता आम्ही आंदोलन करण्याचे ठरविले आहे. शाळा बंद करणे यामागचा उद्देश शुल्क वसुली नाही, असेही राजेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार 50 टक्के पालकांनी शुल्क भरलेले नाहीत. आम्ही राज्य सरकारला शुल्काबाबत मार्चपासून ई-मेल पाठविले आहेत. यावर मार्ग काढावा हे वारंवार सांगत आहोत. ज्या पालकांना शुल्क भरण्यास अडचण असेल त्यांनी शाळांमध्ये येऊन त्याबाबत सांगावे किंवा फेडरेशनशी संपर्क करावा. हा शुल्क प्रश्न असाच राहिला तर जानेवारीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.