आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/mahesh-landge-1.jpg)
- हवेली तालुका कृषि अधिकाऱ्यांना सूचना
- महापौर राहुल जाधव यांची उपस्थिती
पिंपरी । प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे भोसरी परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले
आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. आमदार
महेश लांडगे यांनी नुकसानीची पाहणी करत पंचनामा करण्याचे आदेश हवेली तालुका कृषी
अधिका-यांना दिले. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे.
यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन
काळजे, तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, मंडल कृषी अधिकारी ढाणे, कृषी पर्यवेक्षक अमोल ढवळे,
कृषी सहायक अधिकारी कानडे, मंडल अधिकारी कवडे,
शिल्पा सुभेदार, कृषी सहायक राहुल रोकडे,
कृषी मित्र सुनील वहिले, तलाठी संदीप शिंदे,
पवार यांनी डूडूळगाव येथील सोयाबीन शेतीच्या नुकसानाची पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन पंचनामे केले आहेत.
अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतक-यांना तातडीने
दिलासा देण्याकरिता कृषी विभागामार्फत त्वरित मदत केली जाणार आहे.
च-होली येथे आमदार महेश लांडगे व कृषी अधिकारी ठाकूर यांनी सत्यवान
गिलबिले यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची पाहणी केली.
त्यानंतर परिसरातील नुकसानग्रस्त शेतक-यांना दोन दिवसात अर्ज भरून देण्यास आमदार
लांडगे यांनी सांगितले. शेतक-यांकडून
कमीत कमी कागदपत्र घेऊन त्यांना लवकरात लवकर मदत करण्याच्या सूचना शासकीय
अधिका-यांना देण्यात आल्या. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त भागाची
पाहणी करून त्याच्या नोंदी तात्काळ कराव्यात. तसेच दोन दिवसात तात्काळ पंचनामे
करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिले आहेत. महसूल आणि कृषी विभागाला
तात्काळ फोटो आणि शेतक-यांचे सात बारा व आठ अ उतारे पाठविण्यास देखील सांगण्यात
आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी विधानसभा मतदारसंघामधील
समाविष्ट गावांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
***
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार…
गेल्या आठवड्यापासून वारंवार पडत असणाऱ्या पावसामुळे च-होली, डूडूळगाव, मोशी व चिखली या गावातील काही भागामध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. यामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकट आले आहे. सोयाबीन, मका, बाजरी, भात व भाजीपाला पिके या पिकांची फार मोठ्या प्रमाणवर हानी झाली. हे नुकसान भरून येण्यासाठी स्थानिक शेतक-यांनी आमदार महेश लांडगे यांचेकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार केली. आमदार लांडगे यांनी हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर-राजपूत यांना तातडीने पंचनामे करण्याबाबत आदेश दिले होते.