आमदार जगताप हे तर वॉर्डातले नगरसेवक वाटतात – राहूल कलाटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/10675556_704500839657521_4990095736891676333_n.jpg)
पिंपरी – कोणत्याही सोहळ्यासाठी कार्यक्रम पत्रिका अपेक्षित असते. मात्र, भाजप पदाधिका-यांनी त्यातही थोतांडपणा करून स्वतःची “इमेज बिल्डींग” करण्याचा प्रयत्न केला आहे. याकडे दुर्लक्ष करणारे भाजपचे शहराध्यक्ष आमदार नसून एका वॉर्डातले नगरसेवक वाटतात, अशी बोचरी टिका शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी केली.
महापालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय अर्थसहाय अर्ज वितरण आणि मुद्रा योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज वितरण सोहळा घेण्यासाठी सामाजिक अधिकारिता शिबिर घेण्यात आले. त्याच्या निमंत्रण पत्रिकेतील नावांमध्ये विरोधकांना डावलण्यात आल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी, मनसेने शुक्रवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेऊन भाजपचा निषेध केला. यावेळी कलाटे यांनी आमदार जगताप यांच्यावर नाव न घेता टिका केली.
कलाटे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सोबत घेऊन विकास कामे करणे अपेक्षित असते. मात्र, याठिकाणी विरोधकांना संपविण्याचे कारस्तान भाजपकडून केले जात आहे. त्यामुळेच त्यांनी विरोधकांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःची व पक्षाची इमेज बिल्डींग करायचीच असेल तर विकास कामांच्या माध्यमातून करावी. याकडे भाजप शहराध्यक्षाचे लक्ष नसते. ते तर अलिकडे आमदार नसून महापालिकेच्या एका वॉर्डाचे नगरसेवक वाटत आहेत, अशी टिका कलाटे यांनी केली.