आदर्श शिक्षक पुरस्काराचे येत्या गुरूवारी वितरण
पिंपरी – आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणावरून समज गैरसमज निर्माण झाल्यानंतर शिक्षण समितीने पुरस्कार वितरण गुरूवारी (दि. 20) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी दिली. तर, शिक्षकांना प्रेरणा मिळावी, यासाठी हा सोहळा अन्य कोणाच्या हस्ते न घेता तो शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते घेण्याचे नियोजन होते. परंतु, त्यांची वेळ मिळत नसल्यामुळे थोडा विलंब झाल्याची खंत पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केली.
दरवर्षाप्रमाणे महापालिकेतर्फे आदर्श शिक्षकांची निवड यादी तयार करून त्यांना पुरस्कार दिला जातो. दरवर्षी पुरस्कार वितरण करण्यास प्रशासकीय अडचणींमुळे विलंब होतो. याही वर्षी शिक्षक दिन झाल्यानंतर विलंब होत असल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह अन्य विरोधकांनी विरोधात आवाज उठविला. त्यावर शिक्षण विभागातील प्रशासनाने अगोदरच मागितलेल्या अर्जांची छाणनी करून अंतिम निवड यादी तयार केली. येत्या 20 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी दिली.