आदर्श व्यक्तींना समाजापुढे आणून सकारात्मकतेची पेरणी केली पाहिजे – डॉ. सदानंद मोरे
- प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराचे उत्साहात वितरण
- न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांचा गौरव
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
विकासाच्या प्रवासात विविध क्षेत्रात निष्ठा आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींचे योगदान आहे. प्रचंड ध्येयवादाने प्रेरित होऊन अथक परिश्रमाने आपले ध्येय गाठणाऱ्या आदर्श व्यक्तींना समाजापुढे आणून सकारात्मकता पेरली गेली पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक आणि साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज व्यक्त केले.
नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या “प्राईड ऑफ महाराष्ट्र ” पुरस्काराचे वितरण डॉ. मोरे आणि खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. मोरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाचे राज अहेरराव उपस्थित होते. यावेळी बांधकाम व्यासायिक कृष्णकुमार गोयल, न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नीरज दीपक कुदळे, विवेक लाहोटी, डॉ. प्रकाश जाधवर, सुनील तापकीर, राजशेखरन पिल्ले, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे जगन्नाथ काटे, स्त्रीरोग तज्ज्ञ् डॉ. रमेश सोनवणे, रामचंद्र बुडानिया आणि मनोहर पाटील, श्रीनिवास राठी, आशिष देशमुख, सुनील आगरवाल, निश्चित घाटगे, सुरेश कंक या मान्यवरांचा प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
खासदार अमर साबळे म्हणाले की, व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्तरावर सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्तरावर उपभोगत असलेले भौतिक समाधान हे तात्कालिक असते. परंतु, आध्यात्मिक आणि आत्मिक समाधान लाभण्यासाठी सामाजिक भान बाळगणे गरजेचे आहे.
शिवाजी घोडे यांनी प्रास्ताविक केले. राज अहेरराव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रा. संतोष पातपुते यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री घोडे यांनी आभार मानले.