breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आत्महत्येचा बनाव दाखविण्यासाठी मित्राचाच केला खुन

काळेवाडीतील आरोपीने कर्ज टाळण्यासाठी लढवली भलतीच युक्ती  

पिंपरी | प्रतिनिधी

एका कर्जबाजारी व्यक्तीने कर्जदारांना हुलकावणी देण्यासाठी भलतीच युक्ती लढवली. त्याने पंधरा वर्षांपूर्वी एकाच कंपनीत काम करत असलेल्या मित्राचा खून केला. मृतदेह अर्धवट जाळून तो मृतदेह आपलाच असल्याचे भासवण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी आत्महत्या करत आहे’, असे लिहून ठेवले. मात्र, ही बनावट सुसाईड नोट सापडण्याआधीच हा बहाद्दर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मेहबूब दस्तागिर शेख (रा. राजवाडेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप पुंडलिक माईणकर (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बंगलोर-मुंबई महामार्गावर बाणेर येथे मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. पोलिसांना मृताच्या खिशात अर्धवट जळालेली एक चिठ्ठी सापडली. त्यावरून मृताची ओळख पटल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला.

मृत संदीप यांना दारूचे व्यसन होते. ते कुठेही फिरून मिळेल तिथे खाऊन कुठेही राहायचे. ते वल्लभनगर येथील शिवभोजन थाळी केंद्रावर जेवण करत होते. त्यामुळे पोलिसांनी शिवभोजन थाळी केंद्रापासून तपासाला सुरुवात केली. मात्र, त्यात पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या ब्ल्यूटूथच्या आधारे तांत्रिक तपास केला. ब्ल्यूटूथच्या मालक वाकड येथील असून, तो मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दाखल होती.पोलिसांच्या संशयाची सुई मेहबूब शेख या बेपत्ता व्यक्तीवर आली. त्याच्या नातेवाइकांकडे शोध सुरू केला. मेहबूब याला दोन पत्नी असून, त्याच्या पहिल्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दुसरी पत्नी देखील बेपत्ता होती. मग पोलिसांनी या जोडीचा शोध सुरू केला. त्यावरून मेहबूब हा दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले. मात्र, तो तिथून कुठेतरी गेला होता. त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत पुन्हा पुण्याला गेल्याचे समजले.

दरम्यान, पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावर सापळा रचून मेहबूब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले, की मनीषा, रामदास, अश्रफ नावाच्या व्यक्तींकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. ते त्याच्याकडे कर्ज परत देण्यासाठी वारंवार तगादा लावत होते. त्यांचा तगादा टाळण्यासाठी त्याने एकाचा खून करून तो आपणच असल्याचे भासविले. त्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर “मी कर्जबाजारी झालो असून, मी माझा शेवट करीत आहे. माझी बॉडी ही बाणेर भागातच मिळेल’, असे लिहिले. तो स्टॅम्प पेपर स्वतःकडे ठेवला. मात्र, सुसाईड नोट प्रसारित करण्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button