अनुसूचित जाती जमातींवरील वाढत्या अन्यायाचा अपना वतनतर्फे निषेध
![In Maharashtra, the Scheduled Caste Jamaativriyal injustice is suffering.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/apna-vatan.jpg)
– पिंपरी चौकात राज्य सरकारच्या विरोधात ” निषेध आंदोलन ”
पिंपरी । प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातींवरील अन्याय वाढत आहेत. तसेच महिला मुलींवरील अन्याय ,लैंगिक शोषण व हत्या अशा घटनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जालना, नगर, लातूर, बीड, जळगाव, नांदेड, सांगली या भागातील घटना ताज्या आहेत. काही दिवसांपूर्वी जळगाव येथील एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर त्या मुलीने आत्महत्या केली. या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगे चौक येथे राज्य सरकारच्या विरोधात ” निषेध आंदोलन ” करण्यात आले.
अपना वतन संघटनेच्या शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संगीत शहा, युवा रत्न सेवा समितीचे सचिन वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, आरपीआयचे दुर्गप्पा देवकर, बाळू शिंदे, शंकर इंगळे, किशोर पाटोळे, तौफिक पठाण, सुभाष गलांडे, स्वप्नील कसबे, गणेश जगताप, प्रमोद शिंदे, आप्पा गायकवाड, विशाल वाघमारे, बापू लालजरे, अवधूत कांबळे, सलीम शेख, अफजल शेख, कलीम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातींवरील अन्याय अत्याचार,अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या व खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीसह शासनाच्या निदर्शनास आणून दिले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यांनतर वंचित, पीडित, दुर्बलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु मागील एक वर्षात जनतेचा याबतीत अपेक्षाभंग झाला आहे. त्यांच्या मंत्र्यांवरच लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात न्याय मिळवून देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका त्यांनी केली.
या वेळी महिला अयोग, अनुसूचित जाती जमाती अयोग, अल्पसंख्यांक अयोग यांची जबाबदारी निशचित करून अशी अन्याय अत्याचारची प्रकरणे कमी वेळेत निकाली काढण्यासंदर्भात उपाययोजना करावी. फास्ट ट्रक कोर्टाचे कामकाज वेगात होण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवाव्यात. पीडित कुटुंबाना नुकसान भरपाई विनाविलंब द्यावी. पीडित कुटुंबाना पोलीस संरक्षण देण्यात यावे. राज्य सरकारने शक्ती कायद्याची अमलबजावणी त्वरित करावी. अशा मागण्या करण्यात आल्या.
या वेळी ओबीसी संघर्ष सेनेचे सुरेश गायकवाड, आरपीआयचे किशोर पाटोळे, रयत विद्यर्थी परिषदेचे सूर्यकांत सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आंदोलनाच्या शेवटी पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.