अखेर निगडीतील उड्डाणपुलाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/bjp-pcmc.jpg)
- महापौर माई ढोरे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते उदघाटन
- प्राधिकरणातील रस्त्यांवर येणारा ताण होणार कमी – अनुप मोरे
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती शक्ती चौक, पुणे-मुंबईकडे व मुंबई-पुणेकडे जाणा-या महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजा अविनाश मोरे, भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेविका कमल घोलप, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, विजय भोजणे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/pcmc-2.jpg)
अनुप मोरे म्हणाले की, भक्ती-शक्ती चौकातील उड्डाण पुलाच्या कामाला दोनवेळा मुदतवाढ देऊन देखील काम पूर्ण झालेले नव्हते. पुलाच्या कामासाठी भक्ती-शक्ती चौक बंद केल्याने वाहतूक रूपीनगर व प्राधिकरणातून वळविली होती. वाहनचालकांना सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागत होता. त्यामुळे नागरवस्तीमध्ये अपघाताचा धोका निर्माण झाला होता. नागरी भागात अवजड वाहने येत असल्याने प्राधिकरणातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पुल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली होती. पुलाचे उद्घाटन झाल्याने नागरिकांची यातून सुटका झाली आहे.
माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा मोरे म्हणाल्या, निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम कासव गतीने सुरू होते. अखेरीस प्रशासनाकडून उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ८४९ मीटर असून रुंदी सुमारे १७.२ मीटर आहे तर उंची सुमारे ८.५ मीटर एवढी आहे. याकामी सुमारे २४ कोटी ६२ लाख इतका खर्च करण्यात आलेला आहे. पुणे मुंबई रस्त्याला समांतर उड्डाणपूलाखालुन बीआरटी टर्मिनल व पीएमपीएमएल च्या डेपोकडून सर्व बसेस सहज धावणार असून प्रवासाच्या वेळेत व इंधन बचत होणार असून वायू प्रदुषणात घट होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे.