breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अखेर आ. जगतापांना आली जाग, सांगवी पोलीस ठाणे स्थलांतर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याची आवश्यकता असताना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सांगवी पोलिस ठाण्यातील सुमारे २०० पोलिस अधिकारी व कर्मचारी अवघ्या ५०० चौरस फूट जागेत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. हे सर्वजण अक्षरशः जीव मुठीत घेऊनच सांगवी पोलिस ठाण्यात प्रशासकीय कामे करत आहेत. सांगवी पोलिस ठाण्याची जागा अपुरी पडत असल्याने ती औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाच्या जागेत स्थलांतर करावे म्हणून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. कोरोनाच्या संकट काळात तरी पोलिस बांधवांच्या जिवाचा विचार करून सांगवी पोलिस ठाणे औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाच्या जागेत तातडीने स्थलांतरित करण्यात यावे. तसेच ही जागा पोलिस ठाण्यासाठी हस्तांतरीत करण्याचे तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत येणारे सांगवी पोलिस ठाणे अत्यंत कमी जागेत सुरू आहे. या पोलिस ठाण्याची एकूण जागा अवघे ५०० चौरस फूट आहे. या पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे २०० पोलिस अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत. या सर्वांना प्रशासकीय कामकाजासाठी पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच पातळीवर लढा सुरू आहे. पोलिस व आरोग्य कर्मचारी अग्रभागी लढा देत आहेत. पोलिस रस्त्यावर तर आरोग्य कर्मचारी रुग्णालयात आणि घरोघरी जाऊन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काम करत आहेत. हे काम करत असताना सुरक्षित अंतर ठेवणे (सोशल डिस्टन्सिंग) बंधनकारक आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे वारंवार प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हे महत्त्वाचे आहे. मात्र सांगवी पोलिस ठाण्यातील सुमारे २०० अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी ठाण्यात आल्यानंतर अवघ्या ५०० चौरस फूट जागेत कसे काय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार हा मोठा प्रश्न आहे. हे पोलिस बांधव बाहेर कर्तव्य बजावत असताना त्यांचा अनेकांशी संपर्क येत असतो. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात आल्यानंतर आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येतात. कोरोना संकट काळात अगदी कमी जागेत सहकारी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येणे  हे याठिकाणी नियुक्त असलेल्या सर्वच पोलिस बांधवांसाठी धोकादायक ठरू शकते. याची जाणीव असूनही येथील पोलिस बांधव दररोज आपले कर्तव्य बजावत आहेत. हे करत असताना सर्वच जण दररोज आपला जीव मुठीत घेऊनच पोलिस ठाण्यात दाखल होतानाचे चित्र आहे.

सांगवी पोलिस ठाण्याची जागा अपुरी असल्याने ती सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाच्या जागेत हस्तांतरीत करणे शक्य आहे. रुग्णालयाची उपलब्ध जागा सांगवी पोलिस ठाण्यासाठी मिळावी म्हणून राज्य सरकारकडे आपण सातत्याने पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. मात्र सरकारने त्याची कोणतीच दखल घेतलेली नाही. मात्र आता कोरोनाचे संकट ओळखून तरी सरकारने सांगवी पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या पोलिस बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. पोलिस बांधवांच्या जिवावर बेतू शकणारे सांगवी पोलिस ठाणे औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाच्या जागेत तातडीने स्थलांतरीत करण्यात यावे. तसेच ही जागा सांगवी पोलिस ठाण्यासाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश तातडीने देण्यात यावेत. तसे केल्यास सांगवी पोलिस ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागेत स्थलांतर करून तात्पुरत्या स्वरूपात उभारून तेथून प्रशासकीय कारभाराला सुरूवात होईल.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button