अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरयाच्या दर्शनास भाविकांची गर्दी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/images-11.jpg)
पिंपरी – अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने चिंचवडमध्ये मोरयाच्या दर्शनास भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अंगारकी चतुर्थी असल्याने चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात सकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोरया गोसावी समाधी घाटा शेजारील पटांगणात भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले. अंगारकीमुळे विविध वस्तूंची विक्री करणारे स्टॉल थाटण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीसाठीही मोठी गर्दी दिसून येत आहे. अंगारकीमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरातील संत तुकाराम नगर, शाहू नगर, मोहननगर, निगडी बस स्टॉप गंगानगर, पिंपरी गाव वाघेरे कॉलनी, तपोवन रस्ता, पिंपळे सौदागर कोकणे चौक, पिंपरी कॅम्प येथील वैष्णव देवी मंदिराजवळील अष्टविनायक गणेश मंदिर अशा ठिकठिकाणच्या गणेश मंदिरांमध्येही बाप्पाच्या दर्शनास भाविकांची गर्दी दिसून येत आहे. मंदिरांबाहेर हार, पूजा साहित्य विक्रीची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे.