क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
![Young woman scammed by luring her to invest in crypto currency](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/fraud-780x470.jpg)
मुंबईः क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका ३० वर्षांच्या तरुणीची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. पाच दिवसांमध्ये तिच्या बँक खात्यातून चार लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्यानंतर अज्ञात सायबर ठगांनी तिचे टेलिग्राम अकाऊंटसह व्हॉटअप क्रमांक ब्लॉक केलो आहेत. याप्रकरणी प्रिया, इरमी, झिली, युली, अझीरे आणि डोणी नाव सांगणार्या सहा महिलांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून मेघवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
तक्रारदार तरुणी जोगेश्वरी येथे वास्तव्यास असून मालाडमधील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिला ९ नोव्हेंबर रोजी एका महिलेने व्हॉट्सअप क्रमांकावरून नोकरीविषयी विचारणा केली होती. प्रिया नाव सांगणार्या या महिलेने नंतर एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल करून तिला युट्यूब चॅनेलच्या एका चित्रफीतीला लाईक करण्यास सांगितले. याच मोबाइलवरून ११ नोव्हेंबर रोजी तिला क्रिप्टो करन्सीची एक लिंक पाठविण्यात आली होती. त्यात तिला युजर नेम आणि पासवर्ड तयार करण्यास आणि नंतर गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. या गुंतवणुकीवर हमखास चांगला परतावा मिळेल असे सांगून तिने तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर तिने स्वतःचे खाते उघडून त्यात तीन दिवसांत चार लाख ३७ हजार रुपयांची गुंतवणूक केलीे होती. या गुंतवणुकीवर तिला चांगला परताता मिळत असल्याचे तिच्या खात्यात दिसत होते. मात्र तिला या खात्यातून पैसे हस्तांतरीत करता येत नव्हते. त्यामुळे प्रिया, इरमी, झिली, युली, अझीरे आणि डोणी यांच्याशी व्हॉटस्अपद्वारे संपर्क साधून तिने मदत करण्याची विनंती केली होती. मात्र त्यापैकी कोणीच तिला प्रतिसाद दिला नाही. पाचव्या दिवशी तिचे टेलिग्राम खाते आणि व्हॉटस्अप क्रमांक अचानक ब्लॉक करण्यात आले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मेघवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच सहा महिलांविरुद्ध पोलिसात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.