TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गुन्हे शाखेत महिला पोलीस अधिकारी; पोलीस आयुक्तांचा निर्णय

वसई : मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. गुन्हे शाखेचे काम आव्हानात्मक, साहसी आणि कौशल्याचे असते. महिला अधिकारी हे कामदेखील उत्तमपणे करू शकतात याची खात्री असल्यामुळे महिलांचा समावेश गुन्हे शाखेत कऱण्याचा निर्णय पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी घेतला आहे.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली. आयुक्तालयात गुन्ह्यांच्या तपासासाठी ३ शाखेसह विविध विभाग आहेत. त्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा, सायबर कक्ष, सदोष मनुष्यवध शाखा आदी प्रमुख शाखांचा समावेश आहे. गंभीर गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेमार्फत केला जातो. परराज्यातून तसेच परेदशातूनही आरोपींचे प्रत्यार्पण करून आणले जाते. गुन्हे शाखेचे काम हे साहसी तसेच बुद्धीचा कस लावणारे असते. मात्र या गुन्ह्यांच्या शाखेमध्ये आतापर्यंत एकही महिला अधिकारी नव्हती. सध्या आयुक्तालयात ३७० अधिकारी तर १ हजार ८९६ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे आहेत. त्यामध्ये २२ महिला अधिकारी आणि २४६ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र महिलांचे एवढय़ा प्रमाणात संख्याबळ असूनही त्यांना गुन्हे शाखेत वर्णी लागत नव्हती.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी काही दिवसांपूर्वी महिला पोलिसांचे संमेलन घेण्यास सुरुवात केली होती. महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काय अडचणी भेडसावतात त्या जाणून घेतल्या गेल्या. त्यावेळी काही महिला अधिकाऱ्यांनी आम्हाला गुन्हे शाखेत का घेतले जात नाही अशी तक्रार केली होती. आम्ही केवळ कार्यालयीन काम आणि बंदोबस्तच करायचा का, असा सवालही त्यांनी केला आणि गुन्हे शाखेत  समावेश कऱण्याची विनंती केली होती. पोलीस आयुक्त दाते यांनी तात्काळ ही सूचना मान्य केली आहे. त्यामुळे लवकरच गुन्हे शाखेमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी दिसणार आहेत. महिला पोलीस या धाडसी आणि हुशार असतात. त्यांना गुन्हे शाखेत संधी दिल्यास त्या उत्कृष्ट तपास करू शकतील, असा विश्वास पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमच्यामध्येदेखील ‘लेडी सिंघम’ आहेत. आम्हीदेखील चांगले काम करून पोलीस आयुक्तालयाचे नाव उंचावू, असा विश्वास महिला पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखेतही केवळ दोन महिला

पोलीस आयुक्तालयात १७ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची उकल कऱण्यासाठी स्वतंत्र अशी गुन्हे प्रकटीकरण शाखा असते. मात्र माणिकपूर पोलीस ठाण्याच्या अपवाद वगळता एकाही पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत महिला अधिकारी आणि कर्मचारी नाही. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत पोलीस उपनिरीक्षक रोहिणी डोके आणि अंमलदार पूजा कांबळे या दोन महिला आहेत. मागील वर्षी भरोसा कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये महिलांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. त्यासाठी महिला अधिकारी नियुक्त आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button