ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत अचानक वीज कशामुळे गायब झाली?; यंत्रणेबाबत धक्कादायक माहिती समोर

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर दबाव येऊन एकाएकी वीजप्रवाह खंडित झाल्याची घटना मंगळवारी पुन्हा घडली. ही मागील दीड वर्षातील तिसरी घटना ठरली. मुंबईत वीज आणणाऱ्या यंत्रणांवर कमालीचा भार असून त्यामुळेच त्या कमकुवत झाल्या असल्याचे यावरून पुन्हा सिद्ध झाले

मुंबईत वीज आणणारी यंत्रणा मर्यादित आहे. त्यामुळे सध्याच्या वाहिन्यांमध्ये किंचितसा बिघाड झाला तरी अन्य वाहिन्यांवरील दाब वाढून प्रवाह खंडित होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. १२ ऑक्टोबर २०२०, २७ फेब्रुवारी २०२२ आणि आता २६ एप्रिल २०२२ रोजी हेच झाले. या तिन्ही दिवशी एका वाहिनीत बिघाड होऊन अन्य वाहिन्या भार सहन न करू शकल्याने वीजप्रवाह खंडित झाला.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे अखंडित वीजप्रवाह अत्यावश्यक आहे. सध्या मुंबईत वीज आणणाऱ्या ४०० किलोव्हॅट क्षमतेच्या चार वाहिन्या आहेत. यापैकी दोन वाहिन्या पडघा ते कळवा, तर दोन वाहिन्या तळेगाव ते खारघर अशा आहेत. ४०० किलोव्हॅट क्षमतेच्या वाहिन्यांची कमाल वीजवहन क्षमता ८५० मेगावॉट इतकी असते. परंतु ही कमाल वहन क्षमता झाली. प्रत्यक्षात त्या क्षमतेने वीजवहन केल्यास वाहिन्यांवर भार येण्याची भीती असतेच. त्यामुळे ६५० मेगावॉटहून अधिक विजेचे वहन या वाहिन्यांद्वारे होऊ शकत नाही. त्यानुसार मुंबईत अधिकाधिक २६०० मेगावॉट इतकीच वीज एकावेळी येऊ शकते. पण सध्या ऊन तापले असल्याने मुंबई शहर, उपनगर व महामुंबई क्षेत्र अशी एकूण किमान चार हजार मेगावॉट इतकी मागणी असते. या स्थितीत एका वाहिनीतील बिघाडच अन्य वाहिन्यांना मारक ठरतो, असे दिसले आहे.

मुंबईत वीज आणणारी यंत्रणा सक्षम करणे व अतिरिक्त यंत्रणा उभी करणे हा यावरील उपाय आहे. त्यासाठी पडघा येथील महापारेषण उपकेंद्राच्या बाजूला केंद्र सरकारच्या पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या तब्बल ७५० केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राचा वापर होणे अत्यावश्यक आहे. याचअंतर्गत पडघा ते खारघर व पडघा ते नवी मुंबई (पनवेलजवळ) अशा एकूण चार वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. ही प्रत्येक वाहिनी ४०० केव्ही क्षमतेची असेल. या प्रत्येक वाहिनीची क्षमता एक हजार मेगावॉट असेल. त्यानुसार किमान ३६०० ते चार हजार मेगावॉट इतकी अतिरिक्त वीज मुंबईत येऊ शकेल. त्याखेरीज आपटा-तळोजा ही २२० केव्ही क्षमतेची वाहिनीदेखील या प्रकल्पांतर्गत टाकली जाणार आहे. त्यातून आणखी अतिरिक्त वीज ही मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण महामुंबई क्षेत्राला मिळेल. पण हा प्रकल्प विनाअडथळा तातडीने सुरू होण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button