१ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण! मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती
![The vaccine will be available at 72 centers in Pimpri-Chinchwad on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/coronavirus-vaccine-1.jpg)
मुंबई – अंथरुणाला खिळलेले आणि घराबाहेर पडण्यास असमर्थ असलेले जेष्ठ नागरिक व विकलांग नागरिकांना घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबईत घरोघरी लसीकरण उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आज मुंबई हायकोर्टात दिली. हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याबाबतच्या याचिकेवर सुनावणी होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती न्यायालयाला दिली.
घरोघरी लसीकरणाबाबत केंद्र सरकारने धोरण आखले नसले तरी केरळ, जम्मू-काश्मीर आदी राज्यांमध्ये घरोघरी लसीकरण सुरू आहे. त्यामुळे विकलांग आणि अंथरुणावर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतून हा उपक्रम सुरू केला जाणार आहे, अशी माहिती कुंभकोणी आणि मुंबई महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी मुंबई उच्च हायकोर्टात दिली. ज्या व्यक्तींना घराबाहेर पडता येत नाही त्यांच्या लसीकरणाबाबत गांभीर्याने विचार करा, अशी सूचना हायकोर्टाने मुंबई महापालिका आणि सरकारला केली होती. त्यानंतर पालिकेने अशी मोहीम सुरू करण्याची तयारी दर्शवली. तशी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे येत्या १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी अशी लसीकरण मोहीम पुण्यातून सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता मुंबईतून ते सुरू होणार आहे. यामुळे विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा फायदा होणार आहे. पालिकेने दिलेल्या या माहितीनंतर हायकोर्टानेही राज्य सरकार आणि पालिकेच्या या उपक्रमाची प्रशंसा केली.