मुंबईतील मराठी सणांवर कुठलेही निर्बंध येणार नाहीत- फडणवीस
मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, काही जणांकडून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी गुंगीची औषधे दिली जातात. या अफवांना बळी पडू नका. मुंबई मराठी माणसाची आहे आणि राहील. यापुढे मराठी माणसांच्या सणांवर महाराष्ट्रात बंदी येणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
मुंबई भाजपतर्फे आयोजित ‘मुबई मोरया’ गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण फडणवीस यांच्या हस्ते शिवाजी मंदीर येथे झाले. भारतभर हिंदू सण साजरे होतात. मराठी माणूस गणेश भक्त आहे. गणेशोत्सवाला परवानगी नाकारल्यामुळे आपण गुजरातच्या मागे गेलो. आता काळजीचे कारण नाही. श्री गणेशाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल.
मुंबईकरांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणायचे आहे. गणेशाचे विसर्जन करताना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार समुद्राच्या तळाशी राहिला पाहिजे, असे मागणे मी मागितले आहे. हिंदूंचे सण यापुढे जोरात साजरे होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.