फडणवीसांना कटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
![There is no attempt to trap Fadnavis; Home Minister's explanation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/dilip-walse-patil-new-1.jpg)
मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबाचे पडसाद आज विधानसभेत उमटले.या मुद्यावरून भाजपाने विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात याबाबत निवेदन सादर केले. कोणत्याही कटात फडणवीसांना फसवण्याचा प्रयत्न नाही. त्यामुळे विरोधकांनी आता हा वाद थांबवावा असे आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी केले. त्यावर उत्तर देताना जाणीवपूर्वक कोणीतरी प्रश्न बदलून मला सहआरोपी करता येते का अशा प्रकारचे चार प्रश्न विचारण्यात आले असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. पण त्याआधीच राज्य सरकारने यासंदर्भात एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने अहवाल दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांना तपास करावा लागतो. तपास अधिकाऱ्यांनी २४ जणांचे जबाब नोंदवले. देवेंद्र फडणवीसांना याआधी प्रश्नावली पाठवली होती. त्यांना काही कारणांमुळे उत्तर देता आले नाही. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावली. देवेंद्र फडणवीसांना विचारलेले प्रश्न आणि उत्तरे पाहिली नाहीत. पोलीस विभागाने केंद्रीय गृहसचिवांना पत्र पाठवून देवेंद्र फडणवीसांनी दिलेला पेन ड्राईव्ह देण्याची मागणी केली आहे. कुठल्याही गुन्ह्यामध्ये संबधित असलेल्यांचा जबाब नोंदवावा लागतो. पोलिसांनी काही प्रश्न विचारले तरी त्याचे उत्तर काय द्यायचे हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे हा कामाचा आहे. देवेंद्र फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस पाठवण्यात आलेली नाही. देवेंद्र फडणवीसांना जाणीवपूर्वक कोणत्या कटामध्ये अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न नाही. त्यामुळे हा विषय थांबवण्यात यावा.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मला प्रश्नावली पाठवल्यानंतर मी लेखी उत्तर देऊन याबाबत कळवणार आहे असे सांगितले होते. कारण यामध्ये मला विषेशाधिकार वापरायचा नव्हता. प्रश्नवालीतले प्रश्न आणि काल विचारलेले प्रश्न यामध्ये फरक होता. प्रश्नावलीतले प्रश्न हे साक्षीदाराकरता होते. काल मला जे प्रश्न विचारले ते आरोपीकरता होते. जाणीवपूर्वक कोणीतरी प्रश्न बदलून या व्यक्तीला सहआरोपी करता येते का अशा प्रकारचे चार प्रश्न त्यामध्ये होते. मी अतिशय जबाबदारीने वागलो. त्या ट्रान्सस्क्रीप्ट माझ्याकडे होत्या त्या संध्याकाळी तुमच्या मंत्र्यांने माध्यमांना दिल्या. प्रश्न कुठे आणि कोणी बदलले हे मला माहिती आहे. पण त्याने काही फरक पडत नाही. कोणताही गुन्हा नसताना माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते. त्यामुळे तुरुगांत जाण्यासाठी घाबरणारे आम्ही नाहीत. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी लक्षात घ्यावे की आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढतच राहणार आहोत. यासंदर्भात कायदेशी लढाई असेल ती लढू,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.