उंदराने डोळे कुरतडलेल्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू
मुंबई – घाटकोपरमधील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. श्रीनिवास येल्लप्पा असे या २४ वर्षीय रुग्णाचे नाव आहे. बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला कमानी येथील इंदिरानगरमधील रहिवासी असलेल्या श्रीनिवास यांना मेंदूज्वर आणि यकृताचा आजार होता. प्रकृती बिघडल्याने रविवारी रात्री राजावाडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच श्रीनिवास यांच्या डोळ्याच्या आजबाजूला जखमा आढळून आल्याने मंगळवारी नातेवाईकांनी चौकशी केली असता, उंदराने चावा घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नातेवाईकांकडून रुग्णालय आणि पालिकेच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. आम्ही जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हायचे की जीव धोक्यात घालण्यासाठी? असा सवाल रुग्णाच्या नातेवाईकांनी उपस्थित केला.
दरम्यान, रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच श्रीनिवास यांची प्रकृती गंभीर होती आणि याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा उंदीर चावण्याच्या घटनेशी संबंध नाही, असे राजावाडीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.