माटुंगा रेल्वे स्टेशन जवळ एक्स्प्रेसचा मोठा अपघात, शेवटचे तीन डबे रुळावरुन घसरले
![The last three coaches derailed in a major accident near Matunga railway station](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/The-last-three-coaches-derailed-in-a-major-accident-near-Matunga-railway-station.jpg)
मुंबई |माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ एक्स्प्रेसचा मोठा अपघात झालेला आहे. एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. दोन ट्रेन समोरासमोर आल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गाडी क्रमांक ११००५ मुंबई दादर–पुडुचेरी चालुक्य एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचा अपघात झालाय. आज (शुक्रवारी) रात्री ०९.४५ वाजता ही घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.
माटुंगा रेल्वे स्टेशनजवळील अपघाताने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. अपघातानंतर काही वेळ गोंधळाचं वातावरण होतं. प्रवासी गाडीमधून पटापट उतारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अपघात जरी मोठा असला तरी सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नाही.
रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतीय. दरम्यान दोन्ही गाड्यांचा वेग फारच कमी असल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे. घटनेनंतर तातडीने रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आहेत.
माटुंगा रेल्वे स्टेशनजवळील अपघातान मुंबईबाहेर जाणाऱ्या सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांवर याचा परिणाम होणार असून लोकल सेवेवरही परिणाम होणार आहे. तसंच अपघातामुळे जलद अप आणि डाऊन रेल्वे सेवा देखील बंद आहे. फास्ट ट्रॅकवरील सर्व लोकल स्लो ट्रॅकवर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्लो ट्रॅकवर मोठा भार आला असून सर्व रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.