मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करा, चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
![Start hostels for Maratha students in every district, directions of Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-19-at-10.21.43-AM-696x470.jpeg)
मुंबई ।
इतर मागासवर्ग समाजातील विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सुविधा आहेत, त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात, असे स्पष्ट करतानाच या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह तातडीने सुरू करावेत, असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधताना दिले.
मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. यावेळी ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, बंदरे, खनिकर्ममंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, नियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, आमदार भरत गोगावले, योगेश कदम, प्रवीण दरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील उपस्थित होते.