TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

लवकरच १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवास घडणार

मुंबई : विरार-डहाणूदरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल चालवण्यास मदत होईल, असा आशावाद पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी व्यक्त केला. सध्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरारदरम्यान १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत असून त्यात २१ नोव्हेंबरपासून २६ फेऱ्यांची भर पडली आहे. सध्या विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी सरकारी, खासगी जमिनीचे भूसंपादन सुरू असून प्रकल्पाआड येणारी २४ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी मिळावी यासाठी एमआरव्हीसीने मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही केली आहे. या प्रकल्पाला सध्या गती दिली जात असून येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर पहिली १२ डब्यांची लोकल १९८६ साली धावली आणि त्यानंतर २००६ मध्ये पहिली १५ डब्यांची लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पश्चिम रेल्वेने अंधेरी – विरारदरम्यान धीम्या मार्गांवर १५ डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढविली. त्यानंतर २८ जून २०२१ रोजी या मार्गावर १५ डब्यांच्या लोकलच्या २५ फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आल्या. त्यानंतर या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत गेली. १२ डब्यांच्या लोकलला तीन डबे जोडून १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी २६ फेऱ्या २१ नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर चालवण्यात येत आहेत. सध्या १५ डब्यांच्या नऊ लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात असून १५ डब्यांच्या लोकलच्या प्रतिदिन फेऱ्यांची एकूण संख्या १३२ इतकी आहे.

अंधेरी-विरारदरम्यान १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्यामुळे पश्चिम रेल्वेला फायदा होत आहे. १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांमध्ये रूपांतरित केल्याने प्रत्येक लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढली आहे. भविष्यात या क्षमतेत आणखी वाढ होईल. विरार-डहाणू चौपदरीकरण झाल्यास आणखी दोन मार्गिका उपलब्ध होतील आणि १५ डब्यांची लोकल डहाणूपर्यंत चालवण्यास मदत होईल. सध्या चर्चगेट, दादर, अंधेरी, बोरिवली, विरार दरम्यान (अप-डाउन) १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या होत आहेत. विरार – डहाणूदरम्यान १५ डब्यांसाठी फलाट उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल चालविता येत नाहीत. फक्त १२ डब्यांच्या लोकल धावत आहेत. चौपदरीकरण करताना १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी नवीन फलाटाची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यामुळे डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल चालवली जाईल, असे नीरज वर्मा म्हणाले.

विरार डहाणू प्रकल्प सध्यस्थिती

  • मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे एमयूटीपी ३ अंतर्गत विरार – डहाणू चौपदरीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
  • सध्या येथे उपलब्ध असलेल्या दोन मार्गांवरून लोकल व लांबपल्ल्याच्या गाड्या धावतात. त्यामुळे लोकलचेही वेळापत्रक सुरळीत ठेवणे शक्य होत नाही. शिवाय विरार – डहाणुकरांसाठी लोकलच्या फेऱ्याही वाढवता येत नाहीत. चौपदरीकरण झाल्यास प्रवासांचा प्रवास सुकर होईल. १२ डब्यांबरोबरच १५ डब्यांच्या लोकलही चालवता येतील.
  • चौपदरीकरणासाठी एकूण १८० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. खासगी २९.१४ हेक्टर जमिनीची गरज असून यापैकी २२.६० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर सरकारी १०.२६ हेक्टरपैकी ८.३२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून ३.७७ हेक्टर वन जमीन ताब्यात आल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. १८० हेक्टरमध्ये बहुतांश जमीन ही रेल्वेच्या मालकीची आहे. रेल्वेच्या जमिनीवरील २४ हजार खारफुटीची झाडे प्रकल्पाआड येत असून ती तोडण्यास परवानगी मिळावी यासाठी एमआरव्हीसीने मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही केली आहे.
  • या प्रकल्पात छोट्या-मोठ्या ३१ पुलांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच विरार, वैतरणासह अन्य स्थानकांमध्ये फलाटांची कामे करण्यात येत आहेत.

पश्चिम रेल्वेवर नुकतीच प्रवाशांसाठी १५ डब्यांच्या लोकलच्या नवीन २६ फेऱ्यांची भर पडली आहे. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या आणखी ६७ लोकल फेऱ्या टप्प्याटप्याने वाढवण्याचे नियोजन आहे. या फेऱ्या चर्चगेट – विरारदरम्यान होतील. मात्र विरार – डहाणूदरम्यान १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक असलेले फलाट सध्या नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button