नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर यांना केंद्र शासनाचा सर्वोच्च द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर
![Shooting coach Suma Shirur announced the highest Dronacharya Award of the Central Government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-15T091658.599-780x470.jpg)
पनवेल : केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथे राहणा-या सुमा सिद्धार्थ शिरूर यांना जाहीर झाला आहे. या आधी यापूर्वी २००३ मध्ये सुमा यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांमध्ये सुमा सिद्धार्थ शिरुर यांनी विविध पदके कमावून देशाचे नाव उंचावले आहे. त्यानंतर त्यांनी “पॅरा शूटिंग” या खेळ प्रकारात विविध विद्यार्थी घडवून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याने शिरुर यांना या पुरस्काराचा मान मिळाला आहे.
३० नोव्हेंबरला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शिरुर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्ह्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दिली. सुमा शिरूर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.