ताज्या घडामोडीमुंबई

शरद पवारांचा खोटेपणा उघड; गंभीर आरोप करत भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबई | कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. हिंसाचाराच्या घटनाक्रमाबद्दल माझ्याकडे व्यक्तिगत माहिती नाही. तसंच त्यासंदर्भात राजकीय विचारसरणीबाबतही माझा आरोप नाही, असं त्यांनी म्हटलं. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत म्हटलं आहे की, ‘कोरेगाव भीमा दंगलीच्या निमित्तानं शरद पवारांनी भाजपाला बदनाम करण्यासाठी खोटं बोलत तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र होते असा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्यांनी पत्र लिहिलं होतं. पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केल्याचा दावाही केला. परंतु आता या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पवारांनी आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याने केवळ राजकारणासाठी खोटेपणाचा वापर करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं आणि पत्रकार परिषद घेत सातत्याने भाजपाला बदनाम करावं हे दुर्दैवी म्हणावे लागेल,’ अशा शब्दांत उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

 

ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून आहे, त्या शरद पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी? असा खोचक सवालही केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भाजपकडून करण्यात आलेल्या या टीकेला आता राष्ट्रवादीच्या गोटातून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button