नितिन गडकरींचे नातेवाईक असल्याचे सांगून बापलेकाने डोंबिवलीकरांना गंडवलं
![Union Minister Nitin Gadkari awarded 'Efficient MP' award](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Nitin-Gadkari.jpg)
डोंबिवली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नातेवाईक असं सांगून एका बापलेकाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार डोंबिवलीत उघड झाला आहे. सरकारी नोकरी लावतो आणि स्वस्तात सोनं विकत घेऊन देतो असं आमिष दाखवून वडील राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी यांनी अनेकांना गंडा घातला. मात्र, आनंद गडकरीच्या पत्नीने केलेल्या तक्रारीमुळेच त्यांचं हे भिंग फुटलं असून या बापलेकाना अटक करण्यात आली आहे.
राजन गडकरी आणि आनंद गडकरी हे मुळचे कर्नाटकातील असून त्यांनी डोंबिवलीतील अनेक लोकांना गंडा घातला होता. सरकारी नोकरी आणि स्वस्तात सोनं खरेदीचं आमिष दाखवून दोघांनी अनेकांना लुबाडलं. त्यानंतर ते पसार झाले. मात्र, या दोघांनी पलायन केलं असल्याची माहिती आनंद गडकरी याच्या बायकोला गीतांजली गडकरीला माहिती नव्हती. त्यामुळे बरेच दिवस हे दोघे घरी न आल्याने तिने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आनंद आणि गीतांजली यांना चार वर्षांचा मुलगा देखील आहे. दरम्यान राजन आणि आनंद या दोघांनी माझ्या खात्यातून सर्व आर्थिक व्यवहार केल्याचं गीतांजलीनं पोलिसांना सांगितलं.
गीतांजलीनं दिलेल्या जबाबानंतर आणि फसवणुकीला बळी पडणारे तक्रारदार अतुल पाळसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला.
अखेर दोन पोलीस पथकांनी दोन्ही आरोपींना कर्नाटकातून पकडले असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कारवाईखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दोघांकडून किती पैसे उकळले याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.