TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पावसाळ्यानंतरही लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रस्ता खड्ड्यात

पावसाळा सुरू झाल्यापासून लोकमान्य टिळक टर्मिनसच्या आवारात मोठ्या प्रमाणात खड्डयांचे साम्राज्य पसरले असून आद्यपही हे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. परिणामी, वाहनचालक आणि प्रवाशांना खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या टर्मिनसपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दररोज उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा आणि कोकण आदी  ठिकाणी मोठ्या संख्येने रेल्वेगाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे टर्मिनसवर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी येत-जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा सुरू होताच टर्मिनसच्या आवारातील आणि बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे अद्यापही बुजविण्यात आलेले नाहीत. टर्मिनसच्या आवारातील मोठा रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. हा संपूर्ण रस्ता रेल्वेच्या हद्दीत असल्याने मुंबई महानगरपालिका त्याकडे लक्ष देत नाही.

एकीकडे रेल्वेने कोट्यवधी रुपये खर्च करून टर्मिनसचा कायापालट केला आहे. मात्र रस्त्याची दूरवस्था झाल्याने वाहनचालक आणि प्रवासी संतप्त झाले आहेत. रेल्वेने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच टर्मिनसच्या बाहेरील मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. महानगरपालिकेने या रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र सध्या या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button