मशिदीच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम; राऊतांनी तिरकस शैलीत दिलं उत्तर
![Raj Thackeray's ultimatum to the government over mosque bells; Raut replied in a slanted style](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Raj-Thackerays-ultimatum-to-the-government-over-mosque-bells-Raut-replied-in-a-slanted-style-1.jpg)
मुंबई |मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे ‘राजकीय व्यासपीठांवरून अशा प्रकारच्या घोषणा होतच असतात. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आहे आणि काय निर्णय घ्यायचा हे सरकारला माहीत आहे. कोणीही येऊन काहीही बोलतं आणि आम्हाला कायद्याची भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतं, त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मनसेसह भाजपवरही जोरदार टीका केली आहे. रामनवमीच्या शोभायात्रांमध्ये झालेली हिंसा ही सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणुकांसाठीची तयारी आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. तसंच या देशाला पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले.
सरसंघचालकांच्या वक्तव्यावरही दिली प्रतिक्रिया
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतंच अखंड भारताविषयी एक वक्तव्य केलं आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘संघाने अखंड भारताची भूमिका मांडली असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. देशातील कोणताच पक्ष अखंड भारताच्या भूमिकेला विरोध करणार नाही. मात्र यासाठी त्यांनी १५ वर्षांचा कालावधी सांगितला आहे. आमची तर मागणी आहे पुढच्या १५ दिवसांतच तुम्ही पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घ्या,’ असं तिरकस भाष्य राऊत यांनी केलं आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा निशाणा
‘आयएनएस विक्रांत’ निधी अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला. याविषयी राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मिळणं हा दिलासा घोटाळा आहे. कोर्टाने जरी त्यांना दिलासा दिला असला तरी त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. सोमय्या पिता-पुत्र तुरुंगात जाणारच,’ असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे.