पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ
![Petrol-diesel will be cheaper by another seven rupees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Petrol-1-1-1.jpg)
मुंबई – देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहेत. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसला आहे. आज डिझेलच्या किमतींमध्ये ३३ ते ३७ पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर पेट्रोलच्या दरांमध्ये ३० ते ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यासह देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर १०६.५४ रुपये, तर डिझेलचे दर प्रतिलिटर ९५.२७ रुपये झाले आहेत. तसेच मुंबईत पेट्रोलची किंमत ११२.४४ रुपये आणि डिझेलची किंमत १०३.२६ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर १०७.११ रुपये, तर डिझेलचे दर ९८.३८ रुपये लिटर आहेत आणि चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.६१ रुपये लिटर, तर डिझेल ९९.५९ रुपये लिटरने विकण्यात येत आहे.
येत्या काही दिवसांमध्ये भारतातील इंधनाच्या किंमती आणखी वाढू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीचा परिणाम भारतात २०-२५ दिवसांनंतर दिसून येतो.