गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू, दहा जण जखमी
![Part of the building in Govandi collapsed; Three killed, ten injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Capturebjadwjiqwjri.jpg)
मुंबई – मुंबईत गुरुवारी थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर प्रचंड पाणी साचले होते. त्यानंतर आज पहाटे जोरदार पावसामुळे मुंबईत मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर महापालिकेच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईसह उपनगरांत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे नागरिकांना अनेक प्रकारचे त्रास भोगावे लागत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज पहाटे ४.५८ वाजता गोवंडी शिवाजी नगर प्लॉट नंबर 3, बॉम्बे हॉस्पिटल येथील तळ अधिक एक मजल्याच्या एका इमारतीचा भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० जणांना बाहेर काढून ७ जणांना राजावाडी आणि ३ जणांना सायन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र त्यापैकी नेहा शेख (35 वर्ष), मोकर शेख (85 वर्ष), शमशाद शेख (45 वर्ष) या तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयातून देण्यात आली. तर या रुग्णालयात दाखल असलेल्या परवेझ शेख (50 वर्ष), अमिना शेख (60 वर्ष), अमोल धेडाई (38 वर्ष), स्यामूल सिंग (25 वर्ष) यांची प्रकृती स्थिर आहे आणि मोहम्मद फैज कुरेशी (21 वर्ष), नमरा कुरेशी (17 वर्ष), शाहिना कुरेशी (26 वर्ष) यांच्यावर सायन रुग्णालयात अपघात विभागात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ जणांना मृत्यू झाला होता. चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच भांडूपमध्येही भिंत कोसळून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.