नाहीतर राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा
![Otherwise, elections will not be held in the state, Pankaja Munde warns the government on OBC reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pankaja-munde-.jpg)
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींना मिळणारं अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने आत भाजपच्या नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीत ओबीसी आरक्षणाची रणनिती ठरवण्यात आली असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं सांगतानाच ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.
ओबीसी आरक्षणाबाबात पुढील रणनिती ठरवण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तीन तास झालेल्या या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही
राज्य सरकार नौटंकी करत आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इम्पिरिकल डेटाचा आणि केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने हा विषय हाताळायचा आहे, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. तसा निर्णयच आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असं मुंडे म्हणाल्या.
वडेट्टीवारांच्या बैठकीला जाणार नाही
आम्ही ओबीसींच्या हक्कांसाठी काहीही करायला तयार आहोत. पक्ष आणि राजकारणाचा विषयच येत नाही. मात्र, 26 तारखेला चक्काजाम आंदोलन असल्याने मी आंदोलनात असेल. त्यामुळे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही, असं त्या म्हणाल्या.
1000 हजार स्पॉटवर आंदोलन
येत्या 26 जून रोजी ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. राज्यातील एक हजार स्पॉटवर हे आंदोलन होणार आहे. सरकारकडून ओबीसींची दिशाभूल होत असून त्याचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे, असं सांगतानाच आरक्षण देणं हे सरकारच्या हातात असताना सरकारमधील लोक मोर्चे का काढत आहेत? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.