शाहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “ती जमीन दाखवल्यानंतर…
![On Shah's 'time to show the land' remark, Uddhav Thackeray said, "After showing that land...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Uddhav-Thackeray-Amit-Shah-1.jpg)
मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना “त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे” असं विधान केलं. या विधानावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून भाजपाला साथ देणाऱ्या एकानाथ शिंदे गटातील आमदारांचाही अगदी दोन शब्दांमध्ये समाचार या विषयावर भाष्य करताना घेतला आहे. ‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी भूमिका घेत शाह यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिले. याच भाषणाला संदर्भ उद्धव यांनी मातोश्रीवर काही मोजक्या शिवसेना आमदार आणि खासदारांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत दिला.
आपला दोन दिवसांचा मुंबई दौरा आटपून दिल्लीला परतलेल्या शाह यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वानी सज्ज राहून, भाजप-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. ‘‘राजकारणात सारे काही सोसले, तरी दगाबाजी सहन करू नका. जे दगा देतात, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणात भाजपाचे वर्चस्व दाखविण्याची आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे’’, असे शाह यावेळी म्हणाले. शाह यांनी या भेटीदरम्यान लालबागच्या राजाचं दर्शनही घेतलं. याचाच संदर्भ देत उद्धव यांनी टोला लगावला आहे.