एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट; मराठी अभिनेत्याला अटक
![Offensive post about Eknath Shinde; Marathi actor arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/eknath-shinde.png)
ठाणे – शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरून मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळी मयुरेश कोटकरही उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.