आता मुंबईत खरी लढाई ; देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेला आव्हान
![Now the real battle in Mumbai; Devendra Fadnavis's challenge to Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Devendra-Fadnavis-1.jpg)
मुंबई | आता मुंबईत खरी लढाई होणार असून महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणार, असे प्रतिपादन करीत राज्यातही स्वबळावर सत्तेत येणार, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीला दिले. विजयाने हुरळून न जाता तो नम्रपणाने स्वीकारुन उद्यापासून कामाला लागण्याचे आवाहन फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.
उत्तरप्रदेशसह चार राज्यातील विजयामुळे महाराष्ट्रातही भाजपचा आत्मविश्वास वाढला असून प्रदेश कार्यालयापुढे फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार अॅड. आशिष शेलार, गिरीष महाजन व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत विजयाचा जल्लोष करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२४ मधील निवडणुकांमध्ये स्वबळावर सत्ता काबीज करण्याचे मनसुबे आखत भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजपचे काही नेते महाविकास आघाडीचे सरकार पडेल, अशी भाकिते करीत असले तरी आम्ही हे सरकार पाडणार नाही, मात्र पडल्यास पर्यायी सरकार देवू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत उसंत घेणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालामधून देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू अनुभवली. गोव्यातील विजय हा मोदींचा आहे, आपला त्यात खारीचा वाटा आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.